वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात कुणबी उमेदवार देण्याची समर्थकांची मागणी प्रमोद चिमुरकर यांनी घेतली आमदार सुभाष धोटे यांची भेट



 प्रतिनिधी ब्रम्हपुरी // अनिल कांबळे , 

विधानसभा क्षेत्रात आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता भाजप सह काँग्रेसमध्येही कुणबी उमेदवाराची मागणी जोर धरू लागली आहे. प्रथमताच काँग्रेस भाजपमध्ये कुणबी उमेदवार मिळावा याकरिता कार्यकर्ते आग्रही असल्याचे दिसून येत आहे.  ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडे  ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे.  विरोधी पक्षनेते विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी कुणबी उमेदवार उभा करण्याची मागणी पक्षाकडे केल्याने विजय वडेट्टीवार यांना विधानसभेच्या उमेदवारी करिता समर्थकांचे आव्हान ठरले आहे .


विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार हे गेल्या दहा वर्षापासून ब्रम्हपुरी विधानसभेचे नेतृत्व करीत आहेत. या क्षेत्राकडे विजय वडेट्टीवार यांचा बालेकिल्ला म्हणून राजकीय क्षेत्रात पाहिल्या जाते. वडेट्टीवार यांना शह देण्याकरिता भाजपमध्ये ओबीसी उमेदवाराची मागणी  सुरू असतानाच आता काँग्रेसमध्येही कुणबी उमेदवार देण्याची मागणी होत आहे. काँग्रेसमध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी कुणबी उमेदवाराला उमेदवारी मिळावी याकरिता प्रमोद चिमुरकर यांचे समर्थक मागणी करीत आहेत . 


काँग्रेसमध्ये विधानसभेचा कुणबी चेहरा म्हणून प्रमोद चिमुरकर यांच्याकडे पाहिले जाते. ब्रम्हपुरी , सावली आणि सिंदेवाही तालुक्यांतील ग्रामीण भागांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून प्रभाव आहे. प्रमोद चिमुरकर हे सर्वसामान्यांसाठी न्याय देण्याची क्षमता ठेवतात.  जिल्हा परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने प्रमोद चिमुरकर समर्थकांनी विधानसभेची उमेदवारी मिळावी याकरिता आग्रही मागणी केली आहे.  प्रमोद चिमुरकर ब्रम्हपुरी विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असून  त्यांनी  चंद्रपूर काँग्रेस  कमिटी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची समर्थकासह भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेस प्रमोद चिमुरकर यांना उमेदवारी देणार का ? हे आगामी काळातच निश्चित होणार आहे.

Post a Comment

0 Comments