सेंद्रिय पध्दतीवर भर
ब्रम्हपुरी प्रतिनिधी //अनिल कांबळे:
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय परसबाग निर्मिती उपक्रमात बेलगांव जि. प. शाळेने सन २०२३-२४ मध्ये तालुक्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
बालवयात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पोषणयुक्त आहाराची सवय लागावी म्हणून जि. प. प्राथमिक शाळा बेलगांवने शाळेच्या आवारात परसबाग फुलवली. यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक फळ-पालेभाज्या मिळतातच, याशिवाय श्रमदानाचे महत्व कळण्यास मदत होत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून, शाळेतील वातावरण प्रफुल्लित झाले आहे. याकरीता लोकसहभाग, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंपाकी व मदतनिस यांचे श्रमदान व सहकार्य लाभले आहे.
या परसबागेत भाजीपाला व फळझाडांची लागवड करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांना ताजा भाजीपाला व फळे मिळत असल्याने ते आनंदाने पोषण आहार सेवन करतात.
शाळेच्या आवारातच मुलांना ताज्या फळ-पालेभाज्या मिळाव्यात, तसेच कृषीचे महत्व कळावे याकरीता परसबाग उपक्रम राबविण्यात येत आहे. परसबाग पूर्णपणे सेंद्रिय पध्दतीने असल्याने विद्यार्थ्यांना कंपोस्ट, गांडूळ खत या पर्यावरणपूरक खतांची माहिती मिळत आहे. शाळेच्या परसबागेतील फळ-पालेभाज्याचा विद्याच्यांच्या आहारात समावेश केला जात आहे.
या शाळेचे रुपडे पालटविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, भौतिक सुविधाबरोबरच मुलांचे आरोग्यही चांगले राहावे, या उद्देशातून परसबाग फुलविण्यात आली.
मुख्याध्यापक वैकुंठ टेंभुर्णे, सहाय्यक शिक्षक सचिन परशुरामकर शाळेत नवनवीन उपक्रम राबवित आहेत. परसबागेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लिंकेश्वर अवसरे, उपाध्यक्ष रुपाताई रामटेके, सदस्य विमलताई ठाकरे, मेश्रामताई, पालक मनोज अवसरे, कृषी सहाय्यक या उपक्रमासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांना सहकार्य करीत आहेत. चालू सत्रात पाकळी परसबाग निर्माण करुन लवकरच रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
.jpg)
0 Comments