गडचिरोली;- जिल्ह्यात लायड मेटल कंपनीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) या क्रिकेट स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर रोख बक्षिसे आणि आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, हा खेळ फक्त क्रिकेटपुरता मर्यादित आहे का, की यामागे काही वेगळे उद्दिष्ट आहे, यावर विचार करण्याची गरज आहे.
कोणाची मालमत्ता आणि कोणाचा फायदा
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही स्पर्धा प्रायोजित करणाऱ्या लायड मेटल कंपनीसह इतर कंपन्या गडचिरोली जिल्ह्यातील लोहखनिजांचे उत्खनन करतात. जिल्ह्यातील निसर्गसंपत्तीचा वापर करून त्यातून कोट्यवधींचा नफा कमावणाऱ्या या कंपन्या आता क्रिकेट स्पर्धा भरवण्यासाठी पैसा कसा खर्च करू शकतात? हा पैसा प्रत्यक्षात गडचिरोलीतील लोकांच्याच जमिनी आणि संसाधनांवर मिळवलेल्या नफ्यातून उभारला आहे.
जनतेच्या विरोधाला दडपण्याचा डाव?गडचिरोलीतील जनतेने या लोहखाणींच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. पर्यावरणाचा नाश, विस्थापन, आदिवासींच्या हक्कांवर गदा आणि निसर्गसंपत्तीवर बाहेरच्या कंपन्यांचा वाढता ताबा याविरोधात स्थानिक लोक संघर्ष करत आहेत. पण अशा वेळी क्रिकेट स्पर्धा आयोजित करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे का?
क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांना आकर्षित करणे सोपे आहे. मोठमोठी बक्षिसे, प्रसिद्धी आणि चमकधमक यामुळे लोकांचा खरा संघर्ष आणि त्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहतील,असे चित्र निर्माण करणे हा या कंपन्यांचा हेतू असू शकतो.
डाव ओळखा गडचिरोलीतील लोकांनी या खेळामागचा खरा हेतू ओळखला पाहिजे.क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्याचा किंवा पाहण्याचा निर्णय तुमचा असला, तरी यामागील कंपन्यांचे खरे उद्दिष्ट ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रा.अनिल डी होळी

0 Comments