कोंढाळा येथे वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम
कोंढाळा (ता. देसाईगंज, जि. गडचिरोली)
दिनांक 12 मार्च 2025 रोजी कोंढाळा गावात 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक आणि आदिवासी हक्कांचे लढवय्ये वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण तसेच गोंडी धर्माचे प्रतीक असलेल्या सल्ला गांगरा चिन्हाचे आरावरण माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. अनिल होळी यांनी आपल्या भाषणातून जोरदार भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, "इंग्रज भारतातून गेले, पण त्यांच्या कूटनीती अजूनही देशात टिकून आहे. जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे काम आजही काही मनुवादी विचारसरणीचे लोक करीत आहेत. आजची आवश्यकता आहे एकजुटीने त्यांच्या विरोधात उलगुलान व क्रांती करण्याची."
प्रा. होळी पुढे म्हणाले, "1857 आणि 1947 मध्ये सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र आले आणि लढले. परंतु स्वातंत्र्यानंतर मनुवादी विचारसरणीच्या दहा टक्के लोकांनी इंग्रजांच्या नीतिंचा अवलंब करून उर्वरित 90 टक्के SC, ST,OBC, VJNT आणि सर्व अल्पसंख्यांक लोकांवर वर्चस्व गाजवले. ही सामाजिक-राजकीय विषमता आजही कायम आहे. त्यामुळे आता गरज आहे की सर्व बहुजन घटकांनी एकत्र येऊन नव्या उलगुलानासाठी पुढे यावे."
"आपण मूळ निवासी आहोत, या देशाचे खरे मालक आहोत, मग सत्ता आपल्याच हाती का नाही? ही सत्ता फक्त मूठभर लोकांच्या हाती का? हे बदलण्यासाठी एकजुटीची चळवळ उभी करावी लागेल," असा ठाम संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित माजी आमदार कृष्णाजी गजबे, अध्यक्ष अर्पणाताई राऊत (सरपंच) ,सुनीलजी पारधी तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रकाशजी वट्टी, मनोज सिंहजी गोंड,अतुलजी मसराम , श्रीकृष्णाजी उईके, किशोरजी कुमरे, संदीपजी वरखडे, श्यामजी उईके, निखिलजी नेताम आदी मान्यवर उपस्थित होते तसेच गावकरी, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अभय पुराम व त्यांची चमू यांच्या नेतृत्वात झाले. कार्यक्रमाचे आयोजन समाजातील एकतेचा संदेश देणारे ठरले.
---
0 Comments