प्रतिनिधी//साई चंदनखेडे
पेरमिली;-राजस्थानातून आलेल्या उष्णतेच्या लाटेने तापलेल्या वातावरणात, काल मध्यरात्री पेरमिली व उपविभागात अचानक निसर्गाचा रोख बदलला. रात्री बारा वाजेच्या सुमारास, ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट यांसह मुसळधार पावसाने परिसरात धिंगामस्ती केली.
सुमारे तीन तास चाललेल्या या पावसाने पेरमिलीच्या रस्त्यांवर पाणी साचले. विजेच्या कडकडाटाने आणि ढगांच्या गडगडाटाने रात्रीच्या शांततेला भेदले. काही भागांत वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली, तर झाडे कोसळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. भामरागड परिसरातही पावसाचा जोर जाणवला.
या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. यंदा आधीच २५ टक्के उत्पादनावर समाधान मानावे लागत असताना, या पावसामुळे झाडांवरील तयार आंबा वाऱ्याने गळण्याची भीती आहे. त्यामुळे संभाव्य नुकसानीबाबत नुकसानभरपाईची चर्चा जोर धरू लागली आहे.
तापलेल्या हवामानात या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र निसर्गाची ही धिंगामस्ती संकट घेऊन आल्याचे चित्र आहे.
0 Comments