अहेरी : धुळीने भरलेले रस्ते, वाढलेले अपघात, आणि नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ यामुळे काँग्रेस नेते व जि.प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आक्रमक झाले. आल्लापल्ली ते गुड्डीगुडम आणि गोल्लाकर्जी ते रेपनपल्ली दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे संथगतीने सुरु असलेले काम आणि लोकांच्या नित्याच्या त्रासावरून २६ एप्रिल रोजी चक्काजाम आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. आणि बस्स! रणशिंग फुंकताच संपूर्ण प्रशासनाची धांदल उडाली.
कंत्राटदारांनी वर्षभर गिट्टी-मुरूम टाकून कामाचे केवळ ढोंग उभं केलं. पावसाळा जवळ आला तरी हालचाल नाही. मागील वर्षी झालेल्या हालअपेष्टा लक्षात घेऊन यंदा कंकडालवारांनी आंदोलनाचा इशारा देताच, सत्तेची चाके हालली.
या इशाऱ्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी तातडीची बैठक बोलावून कंत्राटदार आणि काँग्रेस प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून आणली. या बैठकीत काँग्रेस नेते हणमंतू मडावी, अज्जू पठाण, प्रशांत गोडशेलवार, अजय नैताम, सुनीता कुसनाके, नरेंद्र गर्गम, कार्तिक तोगम, भास्कर तलांडे, सुरेखा आलाम, गीता चालूरकर हे उपस्थित होते.
कंकडालवार यांनी जोरदारपणे मांडलेल्या मागण्यांवर ठोस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आले असून, काम सुरूही झाले आहे.
परंतु ही केवळ ब्रेक आहे! लोकांची सहनशक्ती संपली आहे, काम वेळेत पूर्ण न झाल्यास चक्काजाम अटळ, असा सज्जड इशारा अजयभाऊ कंकडालवार यांनी यंत्रणेला दिला आहे.
0 Comments