गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेने मोठा दणका दिला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत 5.44 लाख रुपयांची सुगंधित तंबाखू व 3.80 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा कार असा एकूण 9.24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक 22 एप्रिल रोजी अर्जुनी – देसाईगंज मार्गावर करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखूचा पुरवठा होणार होता. त्यानुसार सापळा रचण्यात आला असता, MH-15-BN-5689 क्रमांकाची इनोव्हा कार अडवून तपासणी केली असता, कारमध्ये बंदी असलेली सुगंधित तंबाखू साठवलेली आढळली.
वाहनचालक अस्पाक मुन्ना शेख (वय 25, रा. संजयनगर, गोंदिया) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सदर तंबाखू ही रवी मोहनलाल खटवानी (रा. गोंदिया) याची असल्याचे उघड झाले.
या दोघांविरुद्ध IPC कलम 3(5), 275, 274, 223, 123 व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 मधील विविध कलमांनुसार देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि. संदीप आगरकर हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थागुशाचे पो.नि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात मपोउपनि. सरीता मरकाम, पोलीस कर्मचारी दीपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, सचिन घुबडे, निशिकांत अलोणे व निकेश कोडापे यांचा समावेश होता.
0 Comments