अखेर...सिरोंचा-आलापल्ली मार्ग जड वाहतूकीस प्रतिबंधित - वृत्ताची जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी घेतली दखल



 गडचिरोल्ली;-सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्यामुळे अद्यापही या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यानच्या कालावधीत आलेल्या अवकाळी पावसामुळे या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक फसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. पावसाळ्यात अवजड वाहनांमुळे वाढणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्याची मागणी सदर परिसरातून जोर धरत होती. यासंदर्भात खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सह दै.नवराष्ट्रनेही सातत्याने वृत्त प्रकाशित करुन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने संभाव्य धोका लक्षात घेत तसेच वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आदेश निर्गमित करीत सदर मार्ग 19 जूनपर्यंत अवजड वाहनास प्रतिबंधित केले आहे. या निर्णयामुळे वाहतूकदारांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सिरोंचा ते आलापल्ली या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाद्वारे सुरु आहे. सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहने सुरु असतात. या रस्त्याची अद्यापही दैनावस्था असल्याने सातत्याने अपघात घडून येत असतात. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन ट्रक रस्त्यातच रुतल्या गेले होते. यामुळे सदर मार्गावर दोन्ही बाजूरा वाहनांच्या रांगा लागून अनेक तास वाहतूक ठप्प पडली होती. या वृत्ताचा संदर्भ घेत खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क व दै.नवराष्ट्रने पावसाळ्याच्या कालावधीत ही अवजड वाहने गंभीर समस्या निर्माण करण्याची शक्यता लक्षात घेत या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनास प्रतिबंधित करण्यासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत तसेच पावसाळ्याच्या कामावरील मार्गावर मोठी दुर्घटना होऊन जीवतहानी टाळण्याच्या दृष्टीकोणातून 12 जून रोजी आदेश जारी करीत 19 जून मध्यरात्रीपर्यंत या मार्गावर जड वाहनास मनाई करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. सिरोंचा-आलापल्ली मार्गे जाणा-या वाहनांनी सिरोंचा-मंचेरियल-राजूरा-बल्लाशहरा-चंद्रपूर-गडचिरोली या पर्यायी मार्गाचा तर आलापल्लीहून मंचेरियल मार्गे आलापल्ली-आष्टी-बल्लारपूर-मंचेरियल मार्गाचा वापर करावा, असे निर्देशित केले आहे. तसेच जड वाहतूकीस संनियंत्रण करण्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे सोपविली असून जिल्हा पोलिस दलाने ट्रॅफिक बंदोबस्त, बॅरिकेडची सुविधा करावी, असेही आदेशात म्हटले आहे. तसेच आदेशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हा नोंदविण्याचेही सक्त आदेश दिले आहेत. जिल्हाधिका-यांच्या या आदेशामुळे सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येणा-या गावांना तसेच इतर वाहनधारकांना पावसाळ्याच्या कालावधीत काहीअंशी दिलासा मिळणार आहे. 

बॉक्ससाठी...

सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्या यश

सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर वाढते अपघात लक्षात घेता पावसाळ्याच्या कालावधीत मागील वर्षीप्रमाणे अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी सातत्याने प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या पुढाकारातूनच मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिका-यांनी पावसाळ्याच्या कालावधीत चार महिन्यांसाठी अवजड वाहनांना प्रतिबंध घातला होता. याच धर्तीवर यंदाच्या पावसाळ्यात अपघाताचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अवजड वाहनांना या मार्गावर प्रतिबंध घालण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. जिल्हाधिका-यांच्या सक्तीच्या निर्देशामुळे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

Post a Comment

0 Comments