खाजगी शाळेकडून पालकांची होणारी लूट थांबवा: आम आदमी पार्टी



ब्रह्मपुरी प्रतिनिधी// अनिल कांबळे


ब्रम्हपुरी शहरात खाजगी शाळांकडून होणारी लूट थांबविण्यात यावी करिता आम आदमी पार्टी ब्रम्हपुरी तर्फे गुरुवार रोजी ब्रम्हपुरी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.


आम आदमी पार्टी विधानसभा अध्यक्ष नावेद खान यांनी निवेदनात म्हटले आहे की, ब्रह्मपुरी शहर हे चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रम्हपुरी शहरातील खासगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट व गैरव्यवहार केले जात आहेत . विद्यार्थ्यांना पुस्तके , गणवेश , नोटबुक व इतर साहित्य ठराविक दुकानांमधूनच खरेदी करा आणि हे साहित्य दुसरीकडे कुठेही मिळणार नाही,असे धोरण आणले जात आहे . यामध्ये सामान्य पालकांची लूट होत असून,अन्याय होत आहे. तसेच अवाजवी शिक्षण शुल्क आकारून पालकांची लूट सुरु आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्राला व्यवसायाचे रुप आले आहे. 

इंग्रजी माध्यमांच्या कुठल्या शाळेत किती विद्यार्थी आहेत आणि किती पैसे घेतले आहेत याची योग्य चौकशी करण्यात यावी तसेच ब्रम्हपुरी शहरातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे ऑडिट करून शिक्षणाच्या मार्गात होत असलेली लूट थांबवत पालकांना दिलासा मिळवून देण्यात यावा अशा आशयाची मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments