सुरजागड लोहखनिज प्रकल्पातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतानाही, एटापल्ली तालुक्यातील बाधित गावांच्या विकासासाठी निधी मिळत नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने खनिज प्रतिष्ठान निधीचा वापर ६०% प्रत्यक्ष बाधित आणि ४०% अप्रत्यक्ष बाधित भागांसाठी करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष बाधित असलेल्या एटापल्ली तालुक्यातील ३८ गावांकडे दुर्लक्ष केले जात आहे, आणि निधी इतर जिल्ह्यांत वळवला जात असल्याचा आरोप होत आहे.
सन २०१६ पासून सुरजागड प्रकल्पाला सुरुवात झाली, तर २०२१ पासून प्रत्यक्ष उत्खनन सुरू झाले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून खनिज प्रतिष्ठान निधीचा गैरवापर सुरू आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत, तरी काही ठिकाणी त्या भागांना ‘खनिज बाधित’ दाखवून निधी वाटला जातो. त्यामुळे एटापल्ली तालुक्याच्या विकासासाठी हा निधी का मिळू शकत नाही? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
सुरजागड खाण प्रकल्प सुरू करताना, एटापल्ली तालुक्यात दहशतीचे वातावरण होते. तरीही स्थानिक ग्रामस्थांनी याला पाठिंबा दिला. मात्र, खनिज उत्खननाचा त्रास सहन करणाऱ्या गावांना वंचित ठेवून, इतर जिल्ह्यांना हा निधी का दिला जातोय? हा प्रश्न विचारला जात आहे.
नुकत्याच झालेल्या जनसुनावणीमध्ये, अनेक विकासकामे आणि पर्यावरणविषयक तक्रारी मांडण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी १०० कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे खरोखरच हा निधी एटापल्ली तालुक्यासाठी वापरण्यात येईल का? अशी आशा निर्माण झाली आहे एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी, रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. खनिज संपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असताना, स्थानिक लोकांनाच त्याचा लाभ मिळत नसेल, तर हे अन्यायकारक आहे. यावर ठोस निर्णय न घेतल्यास, लोक रस्त्यावर उतरतील, असे गावकरी ठामपणे सांगत आहेत.
खनिज प्रतिष्ठान निधीवर एटापल्ली तालुक्याचा हक्क आहे. जर १५ दिवसांत यावर योग्य कार्यवाही झाली नाही, तर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आहे.
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख अक्षय पुंगाटी, पाणी पुरवठा सभापती नामदेव हिचामी, शाखा प्रमुख ऋषभ दुर्गे, विशाल मेश्राम, मंगेश दुर्वा आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments