तेंदुपत्ता मजुरी रखडली : १० दिवसांत पैसे द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई!




 आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत तेंदुपत्ता संकलन मजुरीच्या रखडलेल्या प्रश्नावर जनतेचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत आहे. जवळजवळ १० महिने उलटूनही मजूरांना त्यांचे कष्टाचे पैसे मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे दोषींवर कारवाई करण्याचे जाहीर आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.


कंत्राटदार आणि ग्रामकोष समिती अध्यक्षांचा संगनमताने गैरव्यवहार

आंबटपल्ली, चिचेला, कोडीगाव येथील ग्रामकोष समिती अध्यक्षांनी तेंदुपत्ता संकलनाचा करार बेकायदेशीर मार्गाने करून गडचिरोली येथे २८ नोव्हेंबर २०२३ रोजी में. जोत्सना मोटर्स सावलीच्या नावाने पैसे घेऊन गोपनीय करार केला. मात्र याची माहिती जनतेला दिलीच नाही. मे २०२४ मध्ये अवकाळी पावसामुळे फक्त तीन दिवस संकलन झाले. तरीही त्याचे पैसे आजपर्यंत मजुरांना मिळालेले नाहीत.


ग्रामकोष समिती अध्यक्षांची कबुली, तरीही कारवाई शून्य!




तेंदुपत्ता संकलनाच्या मजूरी संदर्भात ग्रामपंचायत आंबटपल्ली येथे सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये ग्रामकोष समिती अध्यक्षांनीच कंत्राटदाराकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. कोडीगाव येथील अध्यक्ष तुळशीराम कडते यांनी तर थेट १० हजार रुपये घेतल्याचे मान्य केले. मात्र इतक्या गंभीर खुलाशानंतरही या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही.


सरपंचांचे आश्वासन – केवळ स्टंटबाजी?

आंबटपल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आठ-दहा महिन्यांपूर्वी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली होती. मात्र ही भूमिका केवळ प्रसिद्धीसाठी होती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

१० दिवसांची अंतिम मुदत – अन्यथा कायदेशीर कारवाई!


जर पुढील १० दिवसांच्या आत मजुरांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत, तर ११ व्या दिवशी संबंधित ग्रामकोष समिती अध्यक्ष व दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून, तत्काळ कारवाई केली नाही, तर व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आता पाहावे लागेल की, या भ्रष्टाचारातील दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाते की हा विषय पुन्हा दुर्लक्षित राहतो!

Post a Comment

0 Comments