102 माओवाद्यांचा सहभाग; मानसिक परिवर्तनासाठी पोलिसांची सकारात्मक पुढाकार
गडचिरोली, दि. 13 एप्रिल:-हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारलेल्या 102 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी आज गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “विपश्यना परिचय व आनापान ध्यान शिबिराचे” आयोजन करण्यात आले. एक दिवसीय हे शिबिर पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे पार पडले.
गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली व धम्म वसुधरा विपश्यना समिती वडसा, गडचिरोली यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये आत्मशुद्धी, आत्मचिंतन आणि मन:शांतीचा अनुभव देणाऱ्या विपश्यना ध्यानपद्धतीस आत्मसमर्पित माओवाद्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पोलीस प्रशासनाने शांतता व विकासाच्या दिशेने उचललेला हा एक सकारात्मक टप्पा मानला जात आहे. “आनापान” या आरंभिक ध्यानप्रकाराच्या माध्यमातून उपस्थित सदस्यांना अंतर्मुख होण्याचा अनुभव देण्यात आला. समाजाच्या मुख्य प्रवाहात या माजी माओवादी सदस्यांचा समावेश करून त्यांचे पुनर्वसन अधिक सुलभ व्हावे, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू होता.
या शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे, एटीएस नागपूरचे पोनि. विनोद वाकडे, आरमोरी पोलीस स्टेशनचे पोनि. कैलास गवते तसेच धम्म वसुधरा समितीचे पुरुषोत्तम दुधे व वंदना धोंगडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कल्याण शाखेचे पोउपनि. नरेंद्र पिवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
0 Comments