गडचिरोली, दि. १२ एप्रिल २०२५ — जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कोरची पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे समजल्यावर कोरची पोलिसांनी सापळा रचून एकूण १६,०१,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी पोनि. शैलेन्द्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मौजा पकनाभट्टी जांभळी रस्त्यावर सापळा रचला. सकाळी ६:४० वाजता एका संशयास्पद बोलेरो पिकअप वाहनाला अडवून तपासणी केली असता, वाहनात गोवा व्हिस्की, मॅगडोवेल्स नं. ०१, किंगफिशर बिअर, ऑफिसर चॉईस अशा विविध विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स आढळले.
वाहनचालक धम्मत गुणवंत बोरकर (वय २४, रा. गिधाडी, जि. गोंदिया) याला ताब्यात घेऊन कोरची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्याकडून ९,९७,२००/- रुपयांची दारू, चार हजारांचे मुरूमाचे पोते व अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा एकूण १६,०१,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी आणखी एक अज्ञात आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोउपनि. प्रविण बुंदे हे करत आहेत.
ही कारवाई पोनि. शैलेन्द्र ठाकरे, पोउपनि. योगेश पवार, पोउपनि. प्रविण बुंदे, पोहवा राकेश मेश्राम, पोअं. दिनेश कुवर आणि इंसाराम ताराम यांनी यशस्वीपणे पार पाडली.
0 Comments