राष्ट्रीय महामार्गावर मातीचा थर? ८ वर्षांनी सुरू झालेल्या कामात दर्जा धोक्यात!




गडचिरोली : आलापली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी वरील आलापली ते गुडीगुडंम या १६ किलोमीटर रस्त्याचे काम तब्बल आठ वर्षांनंतर सुरू झाले असले तरी, या कामाच्या दर्जावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, या रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी थेट मातीचा वापर करून १० मिमीचा केवळ पृष्ठभागीय लेप दिला जात असल्याचे समोर आले आहे.


शासनाच्या ईपीसी करारनुसार ५०० मिमी खोदून ३०० मिमी मुरुम टाकणे अनिवार्य असताना केवळ १० ते २० मिमी मुरुम वापरला जात आहे. शिवाय जीएसबीचे (ग्रॅन्युलर सब-बेस) नियमानुसार २०० मिमी थर असावा, पण प्रत्यक्षात फक्त ८०-९० मिमी थर टाकला जात असल्याचा आरोप आहे.


कामाच्या ठिकाणी कोणतीही यंत्रसामग्री, मिक्सिंग प्लांट किंवा RMC प्लांट नसून मजुरांच्या मदतीने म्यावली काम सुरु आहे. ठेकेदाराने रात्रौच्या वेळेस मातीवरच लेव्हलिंग-डोजिंग करून बाहेरून आणलेले साहित्य रस्त्यावर टाकल्याचेही निदर्शनास आले आहे.


हा रस्ता ५७ कोटी रुपयांचा असून, २०१७-१८ मध्ये राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र, या निधीचा चुकीचा वापर आणि दर्जाहीन कामांमुळे रस्ता किती काळ टिकेल, हा खरा प्रश्न बनला आहे.


संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या शेजारीच कोणतेही योग्य प्लांट उभारले नसल्याने कामात गती आणि गुणवत्ता नाही. याशिवाय, विभागीय अधिकारी व कन्सल्टन्सी यांचेही प्रत्यक्ष भेट न देता फक्त कागदोपत्री निरीक्षण चालू असल्याचे आरोप झाले आहेत.


या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा ठेकेदाराच्या प्लांटसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.


या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि रस्त्याचा अपघाती धोका वाढण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments