प्रलंबित घरकुलांसह पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली, दि. १३ एप्रिल – प्रधानमंत्री जनजातीय महा न्याय अभियानांतर्गत (पीएम जनमन) जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हास्तरीय आढावा घेतला. दूरदृष्टी प्रणालीद्वारे पार पडलेल्या या बैठकीत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. अनेक योजनांची कामे संथ गतीने सुरु असल्यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावत कामाला वेग देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 8321 घरकुलांपैकी केवळ 448 घरकुले पूर्ण झाल्याचे दिसून आले. उर्वरित कामे रखडल्यावर त्यांनी मुरूम व वाळूच्या उपलब्धतेसंदर्भात चौकशी करत ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेले रस्ते अद्याप सुरू न झाल्याचे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागाशी समन्वय साधून परवानगी मिळवण्याचे आणि १ मे पूर्वी कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिले.
तसेच जिल्ह्यात मंजूर झालेल्या २३ बहुउद्देशीय केंद्रांपैकी काहींचे बांधकामही अद्याप सुरू झाले नसल्याचे लक्षात घेऊन १ मे पूर्वी सर्व ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीत पाणीपुरवठा, पोषण, शिक्षण, आरोग्य, दूरसंचार आणि वनहक्क यांसह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, महसूल, आरोग्य, वन व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments