- सन 2023-24 व 2024-25 मध्ये 3.96 कोटींचा अपहार
- गडचिरोली पोलिसांची तडाखेबंद कारवाई
- इतर आरोपींचा शोध सुरू
देऊळगाव (ता. कुरखेडा) येथील धान खरेदी केंद्रात दोन वर्षांतील कोट्यवधी रुपयांचा अपहार उघडकीस आला असून, याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांमध्ये प्रभारी विपणन निरीक्षक व ग्रेडर चंद्रकांत कासारकर आणि विपणन निरीक्षक हितेश पेंदाम यांचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत 2023-24 या हंगामात 19860.40 क्विंटल धान खरेदी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात 3944.08 क्विंटल धानाचा अपहार झाल्याचे दिसून आले. तर 2024-25 मध्ये 17262.40 क्विंटल खरेदी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात 6140.00 क्विंटल धानाचा पत्ता लागलेला नाही. त्यासोबतच एकदाच वापरायचे जुने बारदानही पुन्हा वापरण्यात आले होते. यामुळे दोन्ही वर्षांत मिळून तब्बल 3,96,65,965/- रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे.
ही गंभीर बाब निदर्शनास आल्यावर कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. उर्वरित आरोपींचा तपास सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास पोनि. महेंद्र वाघ करत आहेत.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतिश देशमुख आणि उपविभागीय अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हाच खरेदीचा ‘केंद्रीय’ भ्रष्टाचार? की आहे अजून मोठं जाळं? — तपास अधिक खोलात जाण्याची शक्यता!
0 Comments