दिरंगी-फुलनार चकमक प्रकरणाचा उलगडा: ४ जहाल माओवादी जेरबंद, ४० लाखांचे इनामी दांपत्यही पोलिसांच्या ताब्यात!




सी-60 जवानाच्या हत्येप्रकरणी सक्रिय सहभाग; पल्ली जंगल परिसरातून धक्कादायक कारवाई

गडचिरोली, दि. 19 एप्रिल 2025 – गडचिरोली जिल्ह्यातील दिरंगी-फुलनार परिसरात झालेल्या चकमकीत सी-60 जवानाच्या हत्येप्रकरणी गडचिरोली पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत चार जहाल माओवादी जेरबंद करण्यात आले आहेत. यात ४० लाख रुपयांच्या इनामी दांपत्याचा समावेश आहे.

हे माओवादी पल्ली जंगल परिसरात रेकी करत असताना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पुढील चौकशीत त्यांचा भूतकाळ उघड झाला आणि त्यांच्या अटकेमुळे मोठ्या कारवायांचा पर्दाफाश झाला. अटकेतील माओवादी हे अनेक चकमक, खून आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये गुंतलेले होते.

अटक केलेल्या माओवाद्यांची नावे अशी –

  1. सायलु भुमय्या ऊर्फ रघु (20 लाखांचे इनामी, डिव्हीसीएस, दक्षिण गडचिरोली विभाग)
  2. जैनी ऊर्फ अकिला (16 लाखांचे इनामी, सचिव – भामरागड एरिया कमिटी)
  3. झाशी तलांडी ऊर्फ गंगु (2 लाखांचे इनामी, भामरागड दलम सदस्य)
  4. मनिला गावडे ऊर्फ सरिता (2 लाखांचे इनामी, भामरागड दलम सदस्य)

या चारही माओवाद्यांविरोधात एकूण 130 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, 2025 मधील दिरंगी-फुलनार चकमकीमध्येही त्यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यानंतर पोलिसांनी माओवाद्यांना आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही केले आहे.

ही कारवाई गडचिरोलीतील नक्षलविरोधी लढ्याला मिळालेला मोठा धक्का मानला जात आहे.


Post a Comment

0 Comments