गडचिरोली;-नवेगावमधील सुयोगनगर भागात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली होती – निवृत्त महिला अधिकारी कल्पना उंदिरवाडे (वय 64) यांची त्यांच्या राहत्या घरी डोक्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना 13 एप्रिल रोजी दुपारी घडली. अज्ञात आरोपीविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र आरोपीचा कसला दुवा नसल्याने ही केस पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरली होती.
मात्र तपासाच्या चक्राला वेग आला आणि केवळ तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा धागा उकलला. संशयित विशाल ईश्वर वाळके (वय 40), जो की मृत महिलेच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विशालवर मोठं कर्ज होतं. पैशांची गरज असल्याने त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने कल्पना उंदिरवाडे यांच्या घरात शिरून त्यांच्यावर हत्याराने वार केला आणि अंगावरील दागिने घेऊन पसार झाला.
ही केस उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी सुरज जगताप यांच्या नेतृत्वात तपास पथक तयार करण्यात आलं. या पथकाने अतिशय बारकाईने तपास करत आरोपीला जेरबंद केलं.
विशाल वाळके याला (18 एप्रिलला) अटक करण्यात आली असून त्याला गडचिरोली न्यायालयात हजर केल्यानंतर 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरज जगताप करत आहेत.
या कामगिरीत गडचिरोली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आणि स्थानिक पोलीस पथकाच्या अधिकारी-अंमलदारांनी उल्लेखनीय योगदान दिलं असून या कारवाईने पोलिसांची तत्परता आणि कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.
हक्काचं घर... पण भाडेकरूच ठरला मृत्यूचा कारण!
कल्पना उंदिरवाडे यांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल!
0 Comments