गडचिरोली ;-जिल्ह्यातील सिरोंचा परिसरात घडलेल्या अनेक चोरीच्या घटनांनंतर पोलिसांनी एका संशयित सराईत चोरट्याला अटक केली आहे. अटकेत घेतलेला आरोपी आकाश नागया कोत्तापेल्ली (वय 20, रा. कोत्तापेल्ली) याने एकूण 11 चोरींची कबुली दिली असून, त्याच्याकडून 2,51,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल व प्रभारी अधीक्षक यतिश देशमुख यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. 9 मे रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान मपोउपनि. प्राजंली कुलकर्णी यांच्या पथकाला गोपनीय माहितीवरून आरोपी मिळून आला. चौकशीत त्याने सिरोंचा आणि असरअल्ली परिसरातील चोरीची कबुली दिली.
सदर आरोपीकडून मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य, गृहपयोगी वस्तू व सिव्हिल कामासाठीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 10 मे रोजी त्यास अटक करण्यात आली असून सध्या पोलीस कोठडीत त्याच्याकडून आणखी तपास सुरू आहे.
ही कारवाई पो. नि. समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि. मारोती नंदे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
0 Comments