गडचिरोली;-गडचिरोली पोलिसांच्या C-60 कमांडोंनी मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांची छावणी उद्ध्वस्त केली. ही छावणी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर, नव्याने सुरू झालेल्या कावंडे FOB जवळ उभारण्यात आली होती.
गुप्त माहितीच्या आधारे अॅडिशनल SP (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 C-60 कमांडोंच्या पथकाने काल संध्याकाळी ऑपरेशन सुरू केले. आज सकाळी क्षेत्राची झडती घेत असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्याला C-60 कमांडोंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तब्बल दोन तासांच्या कालावधीत तीन ठिकाणी अधूनमधून चकमक झाली.
चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहीमेत एक INSAS ऑटोमॅटिक रायफल, एक सिंगल शॉट रायफल, मॅगझिन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर्स, एक वायरलेस रेडिओ, तीन पिट्टू, WT चार्जर आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले. छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
या चकमकीत काही नक्षलवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता असून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जंगलात ओढून नेल्याचा संशय आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे
0 Comments