जाहिरात नाही, ग्रामसभा नाही... सरळ सौदा!
भाजपा संतापली, आंदोलनाची तयारी
अहेरी;- तालुक्यात तेंदूपत्ता हंगाम तापायला लागला असताना आलापल्ली ग्रामपंचायतीत मात्र ‘हेटाळणी’चा लिलाव सुरू आहे. ग्रामसेवकांनी कायदे, नियम आणि पारदर्शकतेला बगल देत आपल्या ओळखीच्या ठेकेदाराला थेट तेंदूपत्ता युनिट देऊन टाकलं. जाहिरात नाही, ग्रामसभा नाही... ग्रामस्थांना विश्वासात घेणं तर दूरच!
हा सर्व प्रकार गुपचूप आणि ‘खाजगी’ पद्धतीने उरकण्यात आल्याचा आरोप करत भाजपने थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. लिलावात पारदर्शकता न राखल्याने स्थानिक आदिवासी बांधवांचे मोठं आर्थिक नुकसान झालं असून दोषी ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा सज्जड इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.
लिलाव की सौदा?
तेंदूपत्ता लिलाव प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी खालील नियम ठरलेले असतानाही त्यांची पायमल्ली झाली:
स्थानिक वर्तमानपत्रांत लिलावाची जाहिरात
ग्रामसभा घेऊन निर्णय प्रक्रिया
आदिवासींचा सहभाग आणि सल्ला
सर्व इच्छुक ठेकेदारांसाठी खुला लिलाव
पण इथे मात्र ‘आपला माणूस, आपला भाव’ पद्धत राबवण्यात आली!
भाजपकडून देण्यात आलेल्या निवेदनावेळी माजी तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार, तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, अभीजीत शेंडे, अंकुश शेंडे, सागर बिट्टीवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता पाहायचं, दोषींना वाचवणारे पुढे येतात का, की कारवाई होते?
0 Comments