अहेरी : अहेरी तालुक्यातील महागाव आणि किष्ठापूर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतराचं नाट्य घडलं आहे. जिथे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपचा निर्विवाद प्रभाव होता, तिथे आता काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघ (आविस) यांनी आपला झेंडा रोवला आहे.
महागाव व किष्ठापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत, अवघ्या काही दिवसांतच राजकीय समीकरणं उलथून टाकत, आविस व काँग्रेसने अभूतपूर्व विजय मिळवला. या निवडणुकीत महागावचे वंदना दुर्गे आणि किष्ठापूरचे नरेंद्र मडावी हे दोघेही उमेदवार सरपंचपदी बिनविरोध निवडून आले.
एकेकाळी पूर्णपणे राष्ट्रवादीच्या नियंत्रणात असलेली किष्ठापूर ग्रामपंचायत आणि भाजप-राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात असलेली महागाव ग्रामपंचायत आज आविस व काँग्रेसच्या ताब्यात गेली, याचे श्रेय जातं ते स्थानिक नेतृत्वाला. माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या नियोजनाने या विजयाला आकार दिला.
विशेष म्हणजे, किष्ठापूरमध्ये सरपंचावर आणलेला अविश्वास प्रस्ताव हे सत्ता बदलाचे निर्णायक टप्पे ठरले. या राजकीय साखळीमुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवा शक्तीसमिकरण उभं राहिलं.
या ऐतिहासिक घडामोडीच्या साक्षीदार ठरलेले अनेक माजी पदाधिकारी, नगरसेवक, आणि ग्रामपंचायत सदस्य – अशोक येलमुले, अजय नैताम, सुनीता कूसनाके, भास्कर तलांडे, सुरेखा आलम, गीता चालूरकर, प्रशांत गोडसेलवार, व इतर कार्यकर्ते – उपस्थित राहून नव्या नेतृत्वाचं स्वागत करताना दिसले.
हा सत्तांतराचा झटका सत्ताधारी गटासाठी केवळ धक्का नाही, तर आगामी स्थानिक निवडणुकांसाठी गंभीर इशाराही ठरू शकतो.
0 Comments