कांदोळी: कांदोळी परिसरातील मुरूम उत्खनन प्रकरणात वनविभागाने पुन्हा एकदा कडक पावले उचलत कारवाई केली आहे. पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. चौके यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटदारावर दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या भागात दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी अवैधरित्या मुरूम उत्खनन प्रकरण उघड झाल्यानंतर वनविभागाने तत्काळ कारवाई करत 3,25,200 रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, या कारवाईची भीती न बाळगता कंत्राटदाराने पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन सुरू केल्याचे निदर्शनास आले.
मुरूम काढताना झाडांच्या मुळांना इजा पोहोचली असून काही झाडे उखडल्याचीही माहिती आहे. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत पुन्हा चौकशी करून वनविभागाने दुसऱ्यांदा कारवाई करत कंत्राटदारावर अतिरिक्त दंड ठोठावला आहे.
या प्रकारामुळे वनविभागाच्या दक्षतेबाबत प्रश्न निर्माण झाले असले तरी दुसऱ्यांदा त्वरित केलेली कारवाई ही विभागाच्या गंभीरतेची साक्ष आहे.
दरम्यान, भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वदीप वाळके यांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली होती. "जर वनविभागाने कारवाई केली नसती, तर आम्ही मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे तक्रार केली असती," असे त्यांनी स्पष्ट केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. चौके यांनी ठोस पावले उचलल्याने आता पुढील उत्खनन थांबते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments