कोडीगावमध्ये घरात घुसून चिमुकलीवर रानडुकराचा हल्ला; नुकसानभरपाईची मागणी





विभागीय संपादक // मारोती कोलावार


कोडीगाव (ता. मूलचेरा) – गडचिरोली जिल्ह्यातील कोडीगाव येथे गुरुवार सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेत रानडुकराने घरात घुसून एक वर्षाच्या चिमुकलीवर प्राणघातक हल्ला केला. प्रदीप आलाम यांच्या घरात ही घटना घडली असून, त्यांच्या एक वर्षाच्या मुलीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिला तातडीने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.


ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. जंगलातून आलेल्या रानडुकराने चक्क घरात प्रवेश करत खेळत असलेल्या चिमुकलीवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे मुलगी जोराने ओरडू लागल्याने कुटुंबीयांनी धाव घेतली आणि तात्काळ रुग्णालयात नेले. 




घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वदीप वाळके यांनी वनपाल नरेंद्र सिडाम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. सिडाम यांनी, “घटनेची माहिती आमच्या निदर्शनास आली आहे. दिनांक १६ मे रोजी आम्ही रुग्णाला जाऊन प्रत्यक्ष पाहणी करू, तसेच शासकीय नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्यात येईल,” असे स्पष्ट केले.


स्थानिक ग्रामस्थांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोडीगावसह परिसरात रानडुकरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी वाळके यांनी केली आहे. घरात घुसून रानडुकराने हल्ला केल्यामुळे भविष्यात अधिक गंभीर घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे असल्याचेही वाळके यांनी सांगितले.


दरम्यान, पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, वनविभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments