चकमकीत चार माओवादी ठार




गडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत नव्याने सुरु करण्यात आलेल्या कावंडे परिसरात माओवादींच्या हालचालींबाबत खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई राबवत चार माओवाद्यांचा खात्मा केला आहे. ही कारवाई गडचिरोली पोलिसांचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश यांच्या नेतृत्वाखाली C60 च्या 12 पथकांतील 300 कमांडो आणि CRPFच्या जवानांनी संयुक्तपणे केली.


ही ऑपरेशन काल दुपारी कावंडे आणि नेलगुंडा येथून सुरू झाली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर इंद्रावती नदीच्या काठावर शोधमोहीम सुरू असताना, आज सकाळी माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. याला पोलिसांकडून तडाखेबाज प्रत्युत्तर देण्यात आले. जवळपास दोन तास हा गोळीबार सुरू होता.


कारवाईनंतर केलेल्या परिसरातील शोधमोहीमेत चार माओवाद्यांचे मृतदेह, एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल, दोन .303 रायफल आणि एक भरमार देशी बंदूक जप्त करण्यात आली आहे. याशिवाय वॉकी-टॉकी, तात्पुरते निवासाचे साहित्य, नक्षली साहित्य आदी साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे.


सदर परिसरात अजूनही शोधमोहीम आणि अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू असून उर्वरित माओवादींचा शोध घेण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठा धसका बसला असून पोलिसांनी नक्षलविरोधी लढ्यात आणखी एक मोठे यश मिळवले आहे.

Post a Comment

0 Comments