एटापल्ली, २९ मे –एटापल्ली तालुक्यातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या त्रासदायक अनुभवांमुळे अखेर संयमाचा बांध फुटला असून, नागरिकांच्या संतप्त भावना आता आंदोलनाच्या रूपात उफाळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा), अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्यातर्फे दिनांक २ जून रोजी सकाळी ११ वाजता जांबिया गट्टा येथील ११/३३ के.व्ही. उपकेंद्रावर "ताला ठोको" आंदोलन छेडण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे परिसरात दिवसागणिक वीजपुरवठा खंडित होत असून, वेळेवर दुरुस्ती न होणे, कर्मचारी अनुपलब्ध असणे, आणि तक्रारींवर दुर्लक्ष या गंभीर त्रुटींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, लहान व्यवसायिक आणि सर्वसामान्य जनतेचे आयुष्य विस्कळीत झाले आहे.
भाकपाच्या म्हणण्यानुसार, मागील काही महिन्यांपासून वेळोवेळी निवेदने, लेखी तक्रारी आणि फोनद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न झाले, मात्र याकडे कोणतीही गंभीर दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळेच आता 'ताला ठोको'सारख्या तीव्र आंदोलनाची वेळ आल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
भाकपाच्या प्रमुख मागण्या:
जांबिया गट्टा उपकेंद्रावर तात्काळ किमान तीन वायरमन नेमावेत.
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या वायरमनच्या कामचुकार वृत्तीची चौकशी करून शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी.
सहा ऑपरेटर नियुक्त असूनही प्रत्यक्षात एकच ऑपरेटर उपस्थित राहतो, उर्वरित अनुपस्थित ऑपरेटरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
भाकपाने स्पष्टपणे इशारा दिला आहे की, हे आंदोलन लोकशाही मार्गाने राबवले जाणार असले तरी, जर कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावरच राहील.
संपूर्ण तालुक्याच्या वीज व्यवस्थापनात सुधारणा न झाल्यास, भविष्यात यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत, भाकपाने प्रशासनासमोर सुस्पष्ट भूमिका मांडली आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments