अबुझमाडच्या जंगलात मोठी पोलिस कारवाई! पाच माओवादी ताब्यात, सात बंदुका जप्त




गडचिरोली;-गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफने एक संयुक्त कारवाई करून मोठा घातपात टाळला आहे. अबुझमाड परिसरातील बिनागुंडा गावाजवळ पाच जहाल माओवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या जवळून ७ बंदुका आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.


ही कारवाई रविवारी (१८ मे) सुरू झाली आणि सोमवारी (१९ मे) सकाळी पोलिसांनी गावात शोधमोहीम राबवली. गावात काही लोक हिरवे-काळे गणवेश घालून शस्त्र घेऊन थांबले होते. पोलिसांना संशय आला आणि त्यांनी अत्यंत शिताफीने पाच माओवादी पकडले. गावात सामान्य लोकही असल्यामुळे गोळीबार टाळण्यात आला.




पकडलेल्या पाच माओवादींपैकी तिघा जणांवर महाराष्ट्र शासनाने बक्षीस जाहीर केलं होतं. उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली या माओवादीवर १६ लाखांचं, पल्लवी मिडीयम ऊर्फ बंडीवर ८ लाखांचं आणि देवे पोडीयाम ऊर्फ सबितावर ४ लाखांचं बक्षीस होतं. उर्वरित दोन माओवादींवर मिळून ८ लाखांचं बक्षीस होतं.


पोलिसांनी त्यांच्या जवळून एक एसएलआर, एक .303 रायफल, तीन सिंगल शॉट रायफल आणि दोन भरमार बंदुका, तीन वॉकीटॉकी आणि इतर साहित्य जप्त केलं आहे.


ही संपूर्ण कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिसांनी या माओवाद्यांविरोधात पुढील कारवाई सुरू केली असून, अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे अल्पवयीन असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं की, माओवादी हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांचं अभियान अधिक तीव्र करण्यात येईल आणि माओवाद्यांनी हिंसाचाराची वाट सोडून आत्मसमर्पण करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असं आवाहनही त्यांनी केलं.



Post a Comment

0 Comments