गडचिरोली;- 28 जून 2025 गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्मित पोस्टे कवंडे जंगल परिसरात घातपाताच्या उद्देशाने रेकी करत असलेला आणि 15 पोलीस जवानांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार ठरलेला जहाल माओवादी अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (उप-कमांडर, कोरची दलम) याला गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफने संयुक्त ऑपरेशनमध्ये शिताफीने अटक केली.
हा आरोपी 2019 मध्ये जांभूळखेडा परिसरात झालेल्या भीषण भुसुरुंग हल्ल्याचा सक्रिय भाग होता, ज्यात 15 जवान हुतात्मा झाले होते. या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, तो सुमारे तीन चकमकी व दोन हत्येच्या गुन्ह्यांचा आरोपी आहे.
27 जून 2025 रोजी रात्री उशीरा, विशेष पथक व सीआरपीएफ 37 बटालियनच्या C कंपनीच्या जवानांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला कवंडे जंगलात पकडले.
महाराष्ट्र शासनाने या माओवादीवर ₹6 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तो अनेक वर्षांपासून छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सक्रिय होता व गुप्त माहिती गोळा करून घातपाताची योजना आखत होता.
तपासात पुढे आले की तो 2012 पासून माओवादी संघटनेत सक्रीय असून, अनेक दलांमधून बदल्या होऊन शेवटी कोरची दलमचा उपकमांडर म्हणून कार्यरत होता.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व विशेष पथकांची सतर्कता यामुळे ही कारवाई शक्य झाली. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी ही माहिती देताना माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पणाचे आवाहन केले आहे.
0 Comments