एटापल्ली, ता. १२ (प्रतिनिधी)आदिवासी अस्मितेचा किल्ला असलेल्या गोटूलमध्ये जनावरं ठेवण्यात आल्याच्या घटनेने आदिवासी समाज संतप्त झाला असून, या कृत्याचा तीव्र निषेध करत ऑल इंडिया आदिवासी महासभेने शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना धडक देत जोरदार आंदोलन केलं. “गोटूलचा अपमान सहन केला जाणार नाही!” अशा संतप्त भावनेने परिसर दणाणून गेला.
कॉ. अश्विनी कंगाली यांच्या नेतृत्वाखाली महासभेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला खडसावलं. “गोटूल ही आमच्या श्रद्धेची जागा आहे. तिथं जनावरं ठेवणं म्हणजे आमच्या अस्मितेची विटंबना!” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
महासभेच्या वतीने पुढील चार ठाम मागण्या करण्यात आल्या:
1. दोषींवर तत्काळ कठोर कारवाई
2. गोटूलची संपूर्ण स्वच्छता व सांस्कृतिक पुनर्प्रतिष्ठा
3.भविष्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी नियमावली
4. आदिवासी समाजाची सार्वजनिक माफी
या निषेधात सामील कार्यकर्त्यांनी “निषेध! निषेध!”, “गोटूलचा अवमान सहन करणार नाही!” अशा घोषणा देत प्रशासनाला जागं केलं.
या प्रकरणाने पुन्हा एकदा आदिवासी परंपरांवरील अतिक्रमणाचा धगधगता मुद्दा ऐरणीवर आणला असून, “हा आमच्या संस्कृतीवरचा हल्ला आहे,” असा निर्वाळा महासभेने दिला.
प्रशासन काय भूमिका घेतं, याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
0 Comments