बैलजोडीच्या जागी ट्रॅक्टर! ग्रामीण संस्कृतीच्या एक पर्वाचा अस्त?






झुंजूमुंजू झाली की घरातून साद यायची – "चल रे सर्जा-राजा"... एकेकाळी गावखेड्यांतील सकाळ बैलजोडीच्या मंजुळ घंटानादाने जागी व्हायची. बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज, बैलांच्या पायातल्या घुंगरांचा नाद, आणि गाडीवानाचा आत्मविश्वास... हा सगळा अनुभव आता आठवणीपुरता राहिला आहे. यंत्रयुगात पाय ठेवणाऱ्या ग्रामीण भागात बैलजोड्या आता हळूहळू इतिहासजमा होत आहेत.


पूर्वी प्रत्येक घरात बैलजोडी असणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जायची. शेतीपासून ते प्रवासापर्यंत बैलगाडीचा उपयोग व्हायचा. कोणीतरी आजारी पडलं, की बैलगाडीचं सुसाट वेगाने धावणं, लग्नसराई असली की वऱ्हाडाची मिरवणूक, वा बाजाराची वाट... सर्वत्र बैलगाडीचाच आधार. मात्र, आता हे चित्रच पूर्णपणे बदलले आहे. ट्रॅक्टर आणि यंत्रांनी ही जागा व्यापून टाकली आहे.


परंपरेला तडे – यंत्राच्या वेगात हरवले सर्जा-राजा


गावोगावी मोटारगाड्या, ट्रॅक्टर आणि यंत्रांची संख्या वाढली असली तरी त्याचवेळी आपली पारंपरिक ओळख हरवू लागली आहे. 'बैलजोडी' ही आता एक सणापुरती गोष्ट उरली आहे – पोळ्याच्या दिवशी एखाद्या शेतकऱ्याच्या दारात सजवलेली जोडी, तीही केवळ फोटोसाठी. उर्वरित वर्षभर या बैलांना कुठलंच काम उरत नाही.


“पूर्वीच्या काळी बैलगाडी हे एकमेव प्रवासाचं साधन होतं. शेतीही पूर्णतः बैलांवर अवलंबून होती. पण आता यंत्रच सर्व काही करतं. त्यामुळे बैलजोड्या गावांतून नाहीशा झाल्या आहेत. फक्त काही जुन्या शेतकऱ्यांकडेच अजून त्या दिसतात,” असे सांगतात पेरमिलीचे शेतकरी देवराव मडावी.


वास्तव कठोर पण सत्य – संग्रहालयात ग्रामीण साज


असेही दिसून येते की, नव्या पिढीला बैलगाडी म्हणजे काय हे माहीतच नसते. त्यांच्या दृष्टीने ती एखादी खेळणीवजा गोष्ट, फोटोत पाहिलेली गोष्ट आहे. परिणामी, पारंपरिक ग्रामीण साजही वस्तुसंग्रहालयात जाऊन पाहावा लागतो, याचे दु:ख वाटते.


तरीही काही दुर्गम भागात, जिथं ट्रॅक्टर पोहोचू शकत नाहीत, तिथं आजही बैलगाडीची गरज भासते. पण हे प्रमाण नगण्य आहे. काळ बदलतोय, गरजा बदलत आहेत, आणि त्या बदलासोबत आपणही वाहून जात आहोत. पण या वेगात आपली संस्कृती, आपली परंपरा हरवू नये, इतकीच माफक अपेक्षा

Post a Comment

0 Comments