"टाळा खोलो" आंदोलनाची चेतावनी काँग्रेस नगरसेवकांनीच झुगारला काँग्रेस खासदारांचा आदेश?

एटापल्ली;- नगरपंचायतीत काँग्रेसची सत्ता असूनही, स्वतःच्याच पक्षाच्या खासदारांचा सार्वजनिक मंचावर दिलेला स्पष्ट आदेश काँग्रेस नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी तब्बल वर्षभर दुर्लक्षित केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बसस्थानकावरचं सार्वजनिक शौचालय गेली दोन वर्षं बंद असून, आजही तसंच आहे. या गंभीर प्रश्नावर अखिल भारतीय महिला फेडरेशनने तीव्र नाराजी व्यक्त करत “टाळा खोलो आंदोलन” छेडण्याचा इशारा दिला आहे.

वर्षभरापूर्वी तहसील कार्यालयात काँग्रेस खासदारांनी सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट मुख्याधिकाऱ्यांना १५ दिवसात शौचालय सुरू करण्याचा आदेश दिला होता. मात्र या आदेशाकडे केवळ दुर्लक्षच नाही, तर सत्ताधारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे सामान्य जनतेला आजही उघड्यावरची वेळ येते आहे.

महिलांच्या प्रतिष्ठेचा आणि आरोग्याचा प्रश्न असूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त महिला संघटनांनी आता थेट लढ्याची भूमिका घेतली आहे. “शासन हलले नाही, तर आम्हीच टाळा फोडू” असा थेट इशारा महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे.

स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार घेणाऱ्या स्थानिक सत्ताधाऱ्यांची ही निष्क्रियता केवळ निराशाजनक नाही, तर अपमानास्पद असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत. सत्तेचा उपयोग जनतेसाठी न करता राजकीय गटबाजीसाठीच होतोय का, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

Post a Comment

0 Comments