इशाऱ्याने जागं झालं प्रशासन; दोन वर्षांनी शौचालय खुलं




एटापल्ली;- बसस्थानकाजवळील सार्वजनिक शौचालय तब्बल दोन वर्षांपासून बंद अवस्थेत होते. अखिल भारतीय महिला फेडरेशन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ पावलं उचलत शौचालय सुरू केलं.

या निर्णयामुळे विशेषतः महिलांना होणाऱ्या अडचणींवर दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत होतं. मात्र आंदोलनाची भाषा प्रशासनाला समजली आणि शेवटी शौचालय सुरू करण्याची वेळ आली.

शहर सचिव, तालुका संयोजक, जिल्हा सहसचिव यांसारख्या नेतृत्वांनी मिळून प्रश्न उचलून धरला. जनतेच्या सोयीसाठी असलेली सुविधा बंद ठेवणं ही बाब गंभीर असून, ही बाब आंदोलकांनी ठासून मांडली. प्रशासनानेही उशिरा का होईना, पण सकारात्मक पाऊल टाकत शौचालय सुरू केलं.

दरम्यान, स्थानिक नेत्यांनी नागरिकांना स्वच्छतेच्या दृष्टीने जबाबदारीने वागण्याचे आवाहन केलं आहे. मिळालेल्या सुविधेचा जपून आणि नीट वापर करावा, असं सांगत त्यांनी लोकशाहीचा अर्थ केवळ मागण्या न करता त्यात सहभाग घेण्यातही आहे, हे अधोरेखित केलं.

Post a Comment

0 Comments