एटापल्ली (ता. १४ जुलै) आज, १४ जुलै रोजी सकाळच्या सुमारास एटापल्ली शहरातील मुख्य चौकात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. CG 19 BS 1019 HI क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकने अतकमवार कॉम्प्लेक्सजवळ महावितरणच्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र विजेच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे काही वेळ शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ महावितरण आणि पोलिस प्रशासनाला माहिती दिली. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन खांबाची पाहणी व दुरुस्तीचे काम सुरू करताना दिसले.
दर दोन दिवसांनी अपघात का?
एटापल्ली शहरात अशा प्रकारचे अपघात नियमितपणे घडत असून, यामागे अपुरी वाहतूक व्यवस्था, रस्त्यांवरील नियोजनाचा अभाव आणि बेदरकार वाहनचालक हे प्रमुख कारणं असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
"प्रशासन कधी जागं होणार?"
"दर दोन दिवसांनी एखादा खांब, एखादी दुचाकी, एखादा रस्ता — पण यंत्रणा मात्र झोपेतच आहे," अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अपघात घडल्यावरच तात्पुरती कारवाई करून वेळ मारून नेली जाते, अशीही टीका करण्यात येत आहे.
आता तरी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वाहनांवर नियंत्रण, वाहतूक संकेत, तसेच रस्त्यांवरील सुधारणा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0 Comments