गोमनी;- गोमनी येथील पशुवैद्यकीय दवाखाना तब्बल वर्षभरापासून बंद आहे. नियुक्त डॉक्टर गेल्या कित्येक महिन्यांपासून गायब असून, उपचाराअभावी जनावरांचे मृत्यू वाढले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात असूनही संबंधित अधिकारी हात झटकून मोकळे झाले आहेत.
पत्रकारांनी याबाबत तालुका पशुधन विकास अधिकारी (LDO) श्री. राठोड यांच्याशी संपर्क साधत जबाबदारीबाबत विचारले असता, त्यांनी "माझ्या हातात काही नाही", "फोन करायचा नाही" अशा बेजबाबदार आणि उद्धट शब्दांत उत्तर देत पत्रकारांची बोळवण केली.
हे वर्तन केवळ पत्रकारांचा अपमान नाही, तर जनतेच्या व्यथा, शेतकऱ्यांचे दुःख आणि शासनाच्या यंत्रणेचा स्पष्ट अपमान आहे.
दवाखाना बंद, डॉक्टर गायब, आणि LDO मात्र मोकाट — ही परिस्थिती प्रशासनाच्या गलथान कारभाराची साक्ष देणारी आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते कॉ. सचिन मोतकूरवार यांनी तीव्र शब्दांत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे –
“जनतेच्या पैशावर चालणारा दवाखाना बंद, अधिकारी गायब आणि प्रशासन मौनधारण करत असेल, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. जर तात्काळ चौकशी करून संबंधित डॉक्टर व LDO राठोड यांच्यावर कारवाई झाली नाही, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी रस्त्यावर उतरेल.”
त्यांनी आणखी इशारा दिला की, “गोमनीसारख्या दुर्गम भागात पशुवैद्यकीय सेवा बंद असणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवावर उठणे. हा अन्याय सहन केला जाणार नाही.”
सत्तेच्या मस्तीपुढे लोकशाही झुकणार नाही!
हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नाही, तर अधिकारी वर्गाचा लोकशाही व्यवस्थेवरील अविश्वास दर्शवतो.
कॉ. मोतकूरवार यांनी याप्रकरणी सखोल चौकशी, तात्काळ डॉक्टर नियुक्ती आणि दोषींवर कठोर कारवाई यासाठी प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली आहे.
गोमनी दवाखान्याचा बंद दरवाजा आता जनआंदोलनाच्या उघड्या दाराशी उभा आहे… आणि यावेळी आवाज दाबता येणार नाही!
0 Comments